भारताच्या राजकीय पटलावर सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून, या साऱ्यामध्ये प्रकाशझोतात आलं आहे ते म्हणजे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर येथील पिपल्स डेमॉक्रेटिक पार्टी म्हणजेच पीडीपी आणि बीजेपी यांच्यातील युतीमध्ये आलेली दरी हे जणूकाही ठरवून केलेलं राजकीय नाट्यच असल्याचं मत ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटर अकाऊंटवरुन मांडलं आहे.

१९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातील काही मिनिटांचं दृश्य पोस्ट करत त्यांनी आपलं मत मांडलं आहे. मुख्य म्हणजे १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि तत्कालीन राजकारणावर उपरोधिक शैलीत भाष्य करणाऱ्या त्या चित्रपटावर आणिबाणीच्या वेळी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सद्यपरिस्थितीशी अब्दुल्ला यांनी चित्रपटातील दृश्याला जोडल्यामुळे सध्या त्याविषयी बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. शबाना आझमी यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती जनता पार्टीच्या खासदार अमृता नाहटा यांनी केली होती.

वाचा : North Korea : जाणून घ्या हुकूमशहा किम जोंग उनचा उत्तर कोरिया नेमका आहे तरी कसा

जनतेमध्ये असणारा असंतोष आणि त्या असंतोषावर तोडगा म्हणून परस्पर विरोधी गटातील व्यक्ती कशा प्रकारे अनोख्या मार्गाचा अवलंब करत पुढची पाच वर्षे जनतेची कशी फसवणूक करतात हे या दृश्यात दाखवण्यात आलं आहे.
अब्दुल्ला यांनी हा व्हिडिओ ट्विट करत भाजपा आणि पीडीपीच्या तुटलेल्या युतीची तुलना मॅच फिक्सिंगशी केली आहे. त्यासोबतच त्यांनी जनता मुर्ख नाही, याविषयीचं सुचक विधानही केलं आहे. त्यामुळे आता वेगळं राजकीय नाट्य रंगण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत.