भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानांनी घुसखोरी केली असून भारतीय हवाई दलाने या विमानांना पिटाळून लावले आहे. परतत असताना या विमानांनी भारतीय सैन्याच्या चौकीजवळ बॉम्ब फेकले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये ३५० दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरले असून भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते.

इम्रान खान यांच्या इशाऱ्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. हवाई दलाने प्रत्युत्तर देताच तिन्ही विमाने माघारी परतली, असे समजते. या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्बहल्ला केला. भारतीय सैन्याच्या चौकीजवळ त्यांनी बॉम्ब फेकले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पाकने घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर श्रीनगर, लेह आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या तिन्ही विमानतळांवरील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या विमानतळांवरील सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.