पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील बालाकोट सेक्टरमध्ये आज, बुधवारी सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची घटना घडली आहे. एएनआयने या घटनेचे वृत्त दिले आहे. यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम हाती घेतली आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच असल्याने काश्मीरमधील प्रशासनाने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी पाकिस्तानकडून राजौरी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिसरातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. गोळीबारासह उखळी तोफांचा मारादेखील करण्यात आला होता. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने स्थानिकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत १ हजार लोकांचे स्थलांतर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून या महिन्यात अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. रविवारीही पाकिस्तानने नौशेरातील नियंत्रण रेषेवरील भागांमध्ये उखळी तोफांचा मारा केल्याने डोंगराळ भागात आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याआधी शनिवारीही सकाळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उखळी तोफांचा मारा केला होता.