जम्मू- काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्याच्या तरुणीला जम्मू- काश्मीरमधून अटक करण्यात आली. दक्षिण काश्मीरमधून तिला अटक करण्यात आली असून तिचा नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे, याचा तपास सुरु आहे.

पुण्यातील येरवडा येथे राहणारी १८ वर्षांची तरुणी दोन वर्षांपूर्वी आयसिसच्या संपर्कात आली होती. मात्र, अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्या मुलीचे समुपदेशन करुन तिला सोडून दिले. सध्या ती काश्मीरमध्ये असून तिच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्या तरुणीला दक्षिण काश्मीर येथून अटक केली. तिची कसून चौकशी सुरु असल्याचे समजते. ती आत्मघाती दहशतवादी होती, अशी देखील माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

जम्मू-काश्मीरमधील पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून आलेली तरुणी खोऱ्यात बॉम्बस्फोट घडवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये हा स्फोट घडवण्याचा तिचा प्रयत्न होता. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिला अटक केली. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तरुणीचे आयसिस कनेक्शन
उच्चभ्रू कुटुंबातील ही तरुणी बंडगार्डन रस्त्यावरील एका महाविद्यालयात शिकत होती. त्यावेळी सोशल मीडियातून ती आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आली होती. २०१५ मध्ये ही बाब तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एटीएसशी संपर्क केला होता. ती सीरियात जाण्याच्या तयारीतही होती. पोलिसांनी केलेल्या समुपदेशनात ती सुधारल्याचे लक्षात आले. मात्र, जुलै २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरला जाण्यासाठी निघाली. त्यावेळी तिला दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले. यानंतर समुपदेशनानंतर तिला पुन्हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले होते. आयसिससाठीच हल्ला घडवण्याचा तिचा प्रयत्न होता का, याचा तपास सुरु आहे.