पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण झाली असताना, आजच पुन्हा एकादा मोठा दहशतवादी हल्ल्या घडवण्याचा कट दहशतवादी संघटनांकडून रचला गेला होता. मात्र पोलिसांच्या खबरदारीमुळे त्यांचा डाव उधळल्या गेला. जम्मू बसस्थानक परिसरात सुमारे सात किलो स्फोटकं जप्त करण्यात पोलिसांना यश आलं. याशिवाय, एका तरूणास देखील अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेला तरूणाचे नाव सोहेल असून तो नर्सिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे व चंदीगडमध्ये शिकतो. विशेष म्हणजे आयडी स्फोटकं पेरण्यासाठी त्याला पाकिस्तानातून संदेश मिळाल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिली आहे .

पुलवामाच्या स्मृतीदिनी घातपाताचा कट उधळला; बस स्टॅण्डजवळ सापडले स्फोटक साहित्य

याबाबत आयोजित पत्रकारपरिषद माहिती देताना जम्मूचे आयजी मुकेश सिंह म्हणाले, ”मागील तीन-चार दिवसांपासून आम्ही हाय अर्लटवर होतो. इंटलिजन्स इनपुटनुसार पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनी दहशतवादी संघटनांकडून मोठा हल्ला घडवण्याची तयारी करण्यात आली होती. यंदाचा हल्ला हा जम्मू शहरात होणार होता.”

तसेच, ”या माहितीच्या आधारावर प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी हाय अर्लट ठेवण्यात आला होता. काल(शनिवार) रात्री आम्ही संशयितरित्या फिरणाऱ्या सोहेल नावाच्या एका तरूणास अटक केली होती. त्याच्याकडे एक बॅग होती तपासणी केली असता, त्याच्या बॅगेतून सहा-साडेसहा किलोची आयडी स्फोटकं आढळून आली. चौकशीत त्याने सांगितले की तो नर्सिंग महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे व चंदीगडमध्ये शिकतो. त्याला पाकिस्तानच्या अल बद्र तंजीमकडून आयडी प्लांट करण्याचा संदेश मिळाला होता.” अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

”आयडी प्लांट करण्यासाठी त्याला तीन – चार ठिकाणांचे टार्गेट देण्यात आले होते. ज्यामध्ये रघुनाथ मंदिर, बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन व लखदत्त बाजार या ठिकाणांचा समावेश होता. चौकशीत हे देखील समजले की, आयडी प्लांट केल्यानंतर तो श्रीनगरला जाणार होता. तिथे त्याला अल बद्र तंजीमचा ओव्हर ग्राउंड दहशतवादी अथर शकील खान भेटणार होता. त्यानंतर तो तंजीमसोबत अॅक्टिव्ह होणार होता.” अशी त्यांची योजना होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे.