सतत होणाऱ्या दगडफेकीवर तोडगा काढण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या नव्या कोऱ्या संकल्पनेमुळे दगड हल्लेखोरांना अटक करण्यात आले आहेत. शुक्रवारी जामा मशिदीजवळ दगडफेक करणाऱ्या काही दगड हल्लेखोरांमध्ये पोलिसांनी साध्या वेशात आपली काही लोक पेरली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास न होता पोलिसांनी खऱ्याखुऱ्या दगड हल्लेखोरांना पडकले. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नेटीझन्स पोलिसांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.

शुक्रवारी जामा मशिद परिसरात नमाज पठण झाल्यानंतर जमावात पोलिसांनी काही आपले विश्वासू साथीदार पेरले. काहीवेळांनंतर जामा मशिद परिसरात दगडफेकीला सुरूवात झाली. यावेळी समोर असलेल्या पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. पोलिस स्वत:चा बचाव करत शांततेत उभे होते. प्रत्येकवेळी लाठीहल्ला करणारे किंवा अश्रू धुरांच्या नळकांड्या वापर करणारे पोलिस शांत होते.

काहीवेळातच गर्दीने रौद्र रूप धारण केले आणि १०० पेक्षा आधिक लोक जमा झाले. या हिंसक जमावाचे नेतृत्व दोन तरूण करत होते. हे जमावात साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी त्या दोन तरूणाला हेरले. यावेळी इतरांना इजा पोहचू नये म्हणून खेळण्यातील बंदूकीचा वापर करत त्यांनी दोन समाजकंठकांना चतुराईने अटक केली. आपला म्होरक्याला पोलिसांनी पडकल्याचे कळताच जमाव पांगला आणि दगडफेक करणारे तरुणही पळून गेले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे.