जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातलं वेयान हे गाव देशातलं पहिलं असं गाव ठरलं आहे, जिथे ४५ वर्षांहून अधिक वयाच्या सर्वच्या सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या गावात एकूण ३६२ वयस्क लोक आहेत आणि त्या सर्वांनी लस घेतलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि जिद्दीमुळे आता ह्या गावाची देशभरात चर्चा सुरु आहे.

नवभारत टाईम्सने याबद्दल सविस्तर वृत्त दिलं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की वेयान हे गाव बांदीपोरा जिल्हा मुख्यालयापासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र तिथे जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना जवळपास १८ किलोमीटरपर्यंत चालत जावं लागतं.

आणखी वाचा- PM Modi announces free COVID-19 vaccines for all : सर्वाना मोफत लस!

बांदीपोरा जिल्ह्याचे मुख्य चिकित्सा अधिकारी बशीर अहमद खान यांनी सांगितलं की गावात इंटरनेट सुविधा नसल्याने शहरातल्या लोकांप्रमाणे इथले लोक ऑनलाईन नोंदणी करु शकत नाही. त्यामुळे इथे नोंदणी झाली नाही. गावातली लसीकरण मोहिम जम्मू-काश्मीर मॉडेलच्या अंतर्गत करण्यात आली. हे मॉडेल म्हणजे पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना लस टोचण्याची १० सूत्रं असलेली एक रणनीती आहे. या भागातलं लसीकरण झालेल्यांचं प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे.

करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा सोमवारी केली. नवे धोरण २१ जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे.

हेही वाचा- मोदी सरकार लसीकरणावर ४५ हजार कोटी खर्च करण्याची शक्यता

विद्यमान विकेंद्रित धोरणानुसार, ४५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे वयोगटातील व्यक्तींचे केंद्राकडून मोफत लसीकरण केले जाते. १८-४४ या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी राज्य सरकारांना लसउत्पादकांकडून लसखरेदी करावी लागते. देशांतर्गत लसनिर्मितीतील ५० टक्के वाटा केंद्र सरकार खरेदी करत असून उर्वरित २५ टक्के लसमात्रा प्रत्येकी राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना खरेदी करता येतात. पण, आता फक्त केंद्र सरकार लसखरेदी करणार असल्याने राज्यांना जागतिक निविदेद्वारे वा अन्य राज्यांशी स्पर्धा करून जास्त किमतीला लसखरेदी करावी लागणार नाही. त्यामुळे राज्यांच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भारही वाचू शकेल.