जम्मू काश्मीरमध्ये बाह्यशक्तींकडून विद्यार्थ्यांना दगडफेकीसाठी उद्युक्त केले जात असून असून दगडफेकीच्या मोबदल्यात त्यांना पैसे पुरवले जात असल्याचा धक्कादायक खुलासा जम्मू काश्मीर पोलिसांनी केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या सुमारे २०० दहशतवादी सक्रीय असून यातील ११० दहशतवादी हे स्थानिक तरुण असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

जम्मू काश्मीरमधील पोलीस महासंचालक एस जे एम गिलानी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार उफाळला असून आता विद्यार्थीही रस्त्यावर उतरुन दगडफेक करत असल्याने सुरक्षा दलांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांना कसे रोखायचे असा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक गिलानी यांनी महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, जम्मू काश्मीरमधील विद्यार्थ्यांना बाह्यशक्तींकडून उद्युक्त केले जात आहे. दगडफेकीसाठी त्यांना पैसे पुरवले जात आहे. पालकांनी संतर्क राहणे गरजेचे असून त्यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे असे आवाहानही त्यांनी केले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी बँकेवर दरोडा टाकल्याच्या घटना घडल्या होत्या. या दरोड्यांमध्ये लष्कर ए तोयबा आणि हिजबूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा दावाही पोलीस महासंचालकांनी केला आहे. राज्यात २०० दहशतवादी सक्रीय असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सोशल मीडिया साईटवरील बंदीच्या परिणामांचा अभ्यास करु आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.  जम्मू काश्मीरमध्ये तणाव निर्माण करणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिला आणि विद्यार्थिनींकडून दगडफेक होत असल्याने जम्मू काश्मीरमध्ये महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. जम्मूत ऑल वूमन इंडिया रिझर्व्ह बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. ऑल वूमन इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या १ हजार कर्मचारी काश्मीरमध्ये तैनात असणार आहेत. या महिला कर्मचारी राज्य पोलिसांना दगडफेकीच्या घटनांवेळी सहाय्य करतील.