जम्मूतील सुंजवान लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गर्भवती महिलेला हल्ल्यात पाठीत गोळी लागली होती. याच दरम्यान तिला प्रसूतीकळा सुरु झाल्या. लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत ही शस्त्रक्रिया पार पाडली असून सध्या महिला व बाळ दोन्ही सुखरुप आहेत.

सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात रायफलमन नाझिर अहमद खान आणि त्यांची पत्नी शाहजदा खान जखमी झाले. शाहजदा या २८ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. हल्ल्यात शाहजदा यांच्या पाठीत एक गोळी लागली होती. गंभीर जखमी झालेल्या शाहजदा यांना हेलिकॉप्टरने श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. गोळी लागल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. तर दुसरीकडे बाळाच्या प्रकृतीलाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी एक आव्हानच होते. महिलेच्या पाठीतील गोळी काढतानाच बाळालाही जन्म देण्याचे आव्हान होते, असे डॉक्टरांनी सांगितले. शेवटी ही किचकट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सैन्याच्या डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पडली आणि महिलेने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

शाहजदा यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्या भावूकच झाल्या होत्या. ‘मी सैन्याचे आभारी आहे. सैन्याच्या डॉक्टरांच्या प्रयत्नामुळेच आज मी आणि माझी मुलगी वाचू शकलो. मी त्यांची ऋणी आहे’ असे त्यांनी सांगितले. रायफलमन नाजिर अहमद खान हे मूळचे बडगाम जिल्ह्यातील रहिवासी आहे.