जम्मू- काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र या हल्ल्यात राष्ट्रीय रायफल्सचा १ जवान शहीद झाला. दुसरीकडे बारामुल्ला येथे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. तिथेही चकमक सुरु आहे.

बडगाममधील द्रांग येथे सोमवारी दुपारी राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांची तुकडी जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत १ जवान शहीद झाला.

गेल्या १० दिवसात दहशतवाद्यांनी तिसऱ्यांदा सुरक्षा दलाला लक्ष्य केले आहे. यापूर्वी ७ ऑक्टोबररोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. तर ३ ऑक्टोबररोजी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर हल्ला केला. श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पवर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. तर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.