जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे जिल्हा पोलीस लाईनवर दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पोलीस दलातील एक जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले.  या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुलवामामधील जिल्हा पोलीस लाईन येथे शनिवारी पहाटे दोन ते तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला.  दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले. पोलिसांनीही दहशतावाद्यांना प्रत्युत्तर दिले असून अद्याप चकमक सुरु आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाची तुकडी रवाना झाली आहे. परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर येत आहे. यातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मात्र या वृत्ताला सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वाढल्या असून सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याच्या १२३ घटना घडल्या होत्या. तर या वर्षी जुलैमध्येच हे प्रमाण ७८ पर्यंत पोहोचले आहे. तसेच या वर्षी जम्मू-काश्मीरमधील ७१ तरुण दहशतवादी संघटनेत भरती झाल्याचे गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी सांगतात. चालू वर्षात १३२ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला असून यातील ७४  दहशतवादी हे पाकिस्तानचे होते. तर  ५८ दहशतवादी हे स्थानिक होते असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यामध्ये लष्कर ए तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दी या संघटनांच्या १४ कमांडर्सचा समावेश होता.