जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत. या घटनेत २ नागरिकही जखमी झाले आहेत. १०- १५ दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त असून हा हल्ला पूर्वनियोजित होता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे पोलिसांच्या पथकावर शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षकासह सहा जवान शहीद झाले. या हल्ल्यात आणखी जवान जखमी झाले असून यातील काही जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. शहीद झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव फिरोझ असून ते पुलवामा येथील रहिवासी आहेत.

जम्मू- काश्मीरमध्ये पोलिसांवरील दहशतवादी हल्ल्याची ही गेल्या २४ तासांमधील तिसरी घटना आहे.  दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री श्रीनगरमधील हैदरपोरा येथे पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेले कॉन्स्टेबल शहजाद यांचा मृत्यू झाला. तर दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात घराबाहेरच पोलीस दलातील शबीर अहमद यांना गोळ्या घातल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे प्राण वाचू शकले नव्हते.