जम्मू- काश्मीरमध्ये पोलिसांवरील दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरुच असून सोमवारी बडगाममध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या चकमकीत पोलिसांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

बडगाममधील चदूरा येथे पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. अद्याप चकमक सुरु असल्याचे वृत्त आहे.

शनिवारी देखील दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता. सोपोर येथे बंद पुकारण्यात आल्याने पोलिसांचे पथक गस्तीवर होते. एका दुकानाबाहेर दहशतवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. यात चार जवान शहीद झाले होते. आठवडाभरात दहशतवाद्यांनी दुसऱ्यांना पोलिसांना लक्ष्य केले आहे.

त्यापूर्वी, ३१ डिसेंबर रोजी पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८५ व्या बटालियनच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात पाच जवान शहीद झाले होते. तर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. तब्बल ३६ तासांनंतर ही चकमक थांबली. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचा संशय होता.