जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. पहाटे पाच वाजता लष्करी तळावर असलेल्या स्टाफ क्वार्टरवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात २ जवान शहीद झाले असून एका चिमुकलीसह चार जण जखमी झाले आहेत. जम्मू शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुमारे दोन ते तीन दहशतवादी असल्याचे सांगण्यात येते. लष्कराने पूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीमही सुरू आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. ऑपरेशन लवकरात लवकर संपावे यासाठी उधमपूर आणि सरसवा येथून पॅरा कमांडर्संनाही पाचारण करण्यात आले आहे.

लष्कराचे अधिकारी एस डी सिंग जमवाल यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पहाटे ४.५५ च्या सुमारास संशयास्पद हालचाल दिसून आली आणि अचानक एका बंकरवर दहशतवाद्यांनी  गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या संख्येबाबत अजून माहिती नाही. त्यांनी स्टाफ क्वार्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून यात एक हवालदार आणि त्याच्या मुलीचा समावेश आहे. अजूनही ऑपरेशन सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, उधमपूर येथेही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 

दरम्यान, परिसरातील शाळांना हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्यासंबंधी संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.