श्रीनगर: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरुच असून बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी पुलवामा येथे पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस दलातील एक जवान शहीद झाला आहे. तन्वीर अहमद असे या जवानाचे असून या हल्ल्यात आणखी दोन जवान जखमी झाले आहेत.

पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर- जम्मू महामार्गावर पम्पोर येथे बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार केला. पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना हा हल्ला झाला.

जखमींना तातडीने पम्पोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तन्वीर अहमद या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुद्दसीर अहमद आणि मोहम्मद अयूब हे दोन जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, जम्मू- काश्मीरमध्ये रमझान निमित्त लागू केलेली शस्त्रसंधी नुकतीच मागे घेण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १५ एप्रिल ते १६ मे दरम्यान दहशतवादाशी संबंधित २० घटना घडल्या. तर मे १७ ते १६ जून दरम्यान दहशतवादाच्या ७३ घटना घडल्या. शस्त्रसंधीच्या कालावधीत २२ दहशतवादी मारले गेले. त्याआधीच्या महिन्यात १४ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.