जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जेनपोरा पोलीस चौकीवर हल्ला केला असून या हल्ल्यात पोलीस दलातील तीन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले असून परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील जेनपोरा येथे मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पोलीस चौकीला लक्ष्य केले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात चौकीबाहेर तैनात असलेले तीन जवान शहीद झाले. तर एक जवान या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील बंदुक हिसकावून पळ काढला आहे. हल्ल्याची माहिती समजताच सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली आहे.
या हल्ल्यात मेहराज (सोपोर), अब्दुल माजिद आणि हमिदुल्लाह हे तीन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, ९ डिसेंबर रोजीही श्रीनगरच्या मुजगुंड परिसरात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये पाच जवान जखमी झाले होते. तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.