जम्मू- काश्मीरमधील त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून घटनास्थळी अजूनही चकमक सुरु आहे.

पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरु केली. मंगळवारी सकाळपासून ही चकमक सुरु आहे. या चकमकीत जम्मू- काश्मीर पोलीस दलातील एक जवान आणि सैन्यातील एक जवान शहीद झाला. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. तिन्ही दहशतवादी हे जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी, १२ दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दीर्घ चकमकीत सुरक्षा दलांनी वेढलेले तीन दहशतवादी निसटण्यात यशस्वी झाले. या चकमकीत सदा गुणाकर राव हा २४ वर्षीय जवान शहीद झाला, तर दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या गोळीबारात जखमी होऊन बघ्यांपैकी चार तरुण ठार झाले होते.