जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी बुधवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अल कायदाचा जम्मू-काश्मीरमधील झाकीर मुसाच्या गटातील हे दहशतवादी असल्याचे समजते. या कारवाईमुळे अल-कायदाच्या काश्मीर युनिटला मोठा हादरा बसला आहे.

पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलाच्या पथकांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. या भागात आणखी दहशतवादी लपले आहेत का याचाही शोध आता सुरु आहे. हे तिन्ही दहशतवादी झाकीर मुसाच्या गटातील आहे. झाकीर मुसा हा अल-कायदाचा जम्मू-काश्मीर युनिटचा प्रमुख आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेने काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय असल्याचे स्पष्ट करत मुसाची निवड केली होती. पोलिसांच्या या कारवाईमुळे मुसाला मोठा हादरा बसल्याचे सांगितले.

सुरक्षा दलांनी यावर्षी १६ जुलैपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये १०४ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली होती. गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना संसदेत ही माहिती दिली होती. तर गेल्या वर्षी गेल्यावर्षी काश्मीर खोऱ्यात १५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.