जम्मू-काश्मीरचे आरोग्य राज्य मंत्री शाबीर खान यांनी श्रीनगर येथे एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली असून काँग्रेस पक्षाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांनी निमूटपणे आपला राजीनामा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सादर केला आहे. त्यांचा राजीनामा आपल्याला मिळाला आहे असे ओमर यांनी सांगितले. दरम्यान मुख्यममंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे
जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सैफुद्दीन सोझ यांनी खान यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते रवींदर शर्मा यांनी दिली.
या प्रकरणी काँग्रेसची भूमिका काय आहे असे विचारले असता शर्मा म्हणाले, की आता कायदा आपले काम करील. जम्मू-काश्मीरमधील डॉक्टर संघटनेने  शाबीर अहमद खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खान यांना ताबडतोब काढून टाका कारण अशा लोकांना थारा देणे म्हणजे सरकारसाठी शरमेची बाब आहे, असे डॉक्टर संघटनेचे निसार उल हसन यांनी सांगितले.
एका महिला डॉक्टरने दिलेल्या तक्रारीच्या आधारे या मंत्र्यांवर काल भादंवि कलम ३५४ ( विनयभंगासाठी जबरदस्ती करणे) कलम ५०९ ( महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतून हावभाव करणे, शब्द वापरणे) काही दिवसांपूर्वी शाहीदगंज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. २८ जानेवारीला सदर महिला या मंत्र्यांना त्यांच्या सचिवालयात भेटायला गेली असताना त्यांनी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या मंत्र्यास शिक्षा करावी असी मागणी संघटनेने केली असून राज्यातील रुग्णालयात शनिवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महिलेने म्हटले आहे, की मंत्र्यांच्या सहकाऱ्याने आपल्याला त्यांच्या कार्यालयात भेटावयास बोलावले, आपण तेथे गेल्यानंतर त्यांनी मंत्र्यांना भेटण्यास सांगितले. नंतर त्यांनी काश्मिरी चहा (कहवा) बनवण्याचे फर्मान आपल्याला दिले, त्यामुळे आपल्याला अयोग्य वाटू लागले व खोलीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मंत्र्यांनी विनयभंगाचा प्रयत्न केला. माकपचे नेते एम.वाय.तारीगामी यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.