जम्मू- दिल्ली दुरांतो एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांना लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी प्रवाशांकडील पैसे, दागिने, मोबाइल फोन, एटीएम कार्ड हिसकावून घेतले. चोरट्यांनी काही प्रवाशांचे गॉगलही चोरले असून अवघ्या 15 मिनिटांमध्ये चोरी करुन ती टोळी पसार झाली आहे.

गुरुवारी पहाटे चार वाजता जम्मू- दिल्ली दुरांतो एक्स्प्रेस दिल्लीजवळील सरई रोहिला स्टेशनजवळ थांबली होती. यादरम्यान सात ते दहा चोरटे एक्स्प्रेसमध्ये शिरले. बी 3 आणि बी 7 या दोन वातानुकूलित डब्यांमध्ये चोरटे गेले. त्यांनी प्रवाशांना चाकू व अन्य तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत लुबाडले. चोरट्यांनी प्रवाशांकडील एटीएम कार्ड, दागिने, पैसे हिसकावून घेतले. चोरट्यांनी काही प्रवाशांकडील गॉगलही चोरल्याचे समोर आले आहे.

अश्विनी कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, रेल्वे डब्यात एकही सुरक्षा रक्षक नव्हता. तसेच टीटी किंवा कोच अटेंडंटही नव्हता. चोरट्यांनी 15 मिनिटांत चोरी करुन पळ काढला. प्रत्येक प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील मौल्यवान वस्तू त्यांनी चोरल्या, असे अश्विनी कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी प्रवाशांनी केलेल्या वर्णनाच्या आधारे चोरट्यांचे रेखाचित्र तयार करायला सुरुवात केली असून लवकरच आरोपींना अटक करु, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या ट्रेनमध्ये आरपीएफचा कर्मचारी नव्हता, असे आरपीएफमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.