आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करणारा जम्मूमधील तरुण आयपीएस अधिकारी सध्या चांगलाच चर्चेत आहे. दक्षिण जम्मू पोलीस अधीक्षक संदिप चौधरी दिवसातीस दोन तास स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवतात. ज्यांना कोचिंगचा खर्च परवडत नाही अशा विद्यार्थ्याना संदिप चौधरी शिकवणी देतात. विद्यार्थ्यांसाठी संदिप चौधरी यांनी ‘ऑपरेटिंग ड्रीम्स’ सुरु केलं असून त्यांच्या ध्येयात शैक्षणिक अडथळे येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असतात.

२०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे संदिप चौधरी यांनी सुरुवातीला आपल्या ऑफिस चेंबरमध्येच १० विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देण्यास सुरुवात केली होती. या विद्यार्थ्यांना पोलीस उप-निरीक्षक होण्याची इच्छा होती. काही दिवसातच विद्यार्थ्यांचा हा आकडा तब्बल १५० वर पोहोचला आहे. संदिप चौधरी यांच्याकडे बँकिंग सेक्टर, स्टाफ सिलेक्शन कमिशनसहित नागरी सेवेत दाखल होण्याची इच्छा असणारे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. या सर्वांसाठी त्यांनी वेगवेगळ्या सुविधा केल्या आहेत.

संदिप चौधरी यांनी आपला क्लास एका खासगी कम्युनिटी सेंटरमध्ये शिफ्ट केला आहे. हा क्लास त्यांच्या ऑफिसच्या जवळच असून जागा मालकानेही कोणतंही शुल्क न घेता मदत करण्यास तयारी दर्शवल्याने त्यांचा मार्ग सोपा झाला.

‘मी माझ्या सहकाऱ्यांसोबत पोलीस उप-निरीक्षक परीक्षेसंबंधी चर्चा करत असताना इच्छुक उमेदवारांना मोफत शिकवणी देण्याची कल्पना मला सुचली. प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांचा आकडा वाढत आहे. महत्वाचं म्हणजे क्लासमध्ये २५ मुलीही आहेत’, असं संदिप चौधरी अभिमानाने सांगतात.

संदिप चौधरी यांचाही आयपीएस होण्याचा प्रवास खडतर होता. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कोणताही क्लास लावला नव्हता. ‘मी माझं बीए आणि एमए इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून पुर्ण केलं. पत्रकारितेसाठी मी पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला पण काही अडचणींमुळे तीन महिन्यातच कोर्स सोडला. यानंतर मी एमएसाठी प्रवेश घेतला. माझ्या मित्र आणि सिनिअर्सनी युपीएससीच्या तयारीसाठी मला खूप मदत केल’, असं संदिप चौधरी सांगतात.

‘मुलांना मोफत शिकवणी देऊन मी फक्त त्यांचा पैसा वाचवण्याचं आणि त्यांचं करिअर उभं करण्याचं काम करत नसून यामुळे मला एक आनंद मिळतो. मीदेखील असाच शिकलो आहे. उद्या जेव्हा ते मोठे अधिकारी होतील तेव्हा तेदेखील दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येतील’, असा संदिप चौधरी यांना विश्वास आहे. ‘मी तरुणांमध्ये गुंतवणूक करत आहे आणि उद्या ते या समाजाच्या कामी येतील’, असंही त्यांनी सांगितलं आहे.

‘कोचिंग सेंटरमध्ये कोणत्याही छोट्या कोर्ससाठी १५ ते २० हजार रुपये घेतले जातात. पण हे मोफत असून फायद्याचंही आहे’, असं संदिप चौधरी यांनी सांगितलं आहे.