जम्मू- काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात मचैल देवीच्या यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बसवर काळाने घाला घातला. भूस्खलन झाल्याने भाविकांची बस दरीत कोसळली असून यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

किश्तवाड – पद्दार रोडवर भूस्खलन झाल्याने भाविकांना घेऊन निघालेली बस दरीत कोसळली. बस नदीत कोसळल्याने भाविकांना बसमधून बाहेर पडायची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत बसमधील १२ भाविकांचा मृत्यू झाला असून यातून ५ वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली. त्याला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १२ पैकी ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

२५ जुलै रोजी मचैल देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा एकूण ४३ दिवस चालते. या यात्रेत आत्तापर्यंत दीड लाख भाविक येऊन गेले आहेत. मात्र, देवीच्या मंदिराकडे जाणारा मार्ग हा धोकादायक मानला जातो. या मार्गावरील भूस्खलनचा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित केला, मात्र रस्त्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप आमदार जी एम सरुरी यांनी केला.