भारतीय सैन्याने गुरूवारी सीमारेषेवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ५ जवान ठार झाल्याचे वृत्त आहे. सीमारेषेवरील भिंबर व बटाल सेक्टरमध्ये सैन्याकडून ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतीय सैन्याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. हा प्रतिहल्ला इतका जबरदस्त होता की यामध्ये पाकचे ५ सैनिक मारले गेले. याशिवाय, पाकचे आणखी सहा सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

तत्पूर्वी आज सकाळी पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. याशिवाय, जम्मू काश्मीरमधील राजौरी आणि पूँछ जिल्ह्यातील सीमारेषेवर सकाळी मोठा शस्त्रसाठा आढळला. नौशेरा सेक्टरमध्ये सकाळी ७.२० च्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला. भारतीय सैन्यानेही त्यांना सडेतोड उत्तर दिले. चार दिवसांपूर्वी याच परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि घुसखोरांमध्ये चकमक झाली होती. यापूर्वी देखील बालाकोट सेक्टरमधील मेंढर परिसरात १५ दिवसांपूर्वी पाकिस्तानने गोळीबार केला होता. याशिवाय, सोपोर येथील नाथी पोरा परिसरातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरूवारी चकमक झाली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये अनेक जण उच्चशिक्षित

गेल्या काही दिवसांत भारत-पाक सीमेवरील तणाव कमालीचा वाढला आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले होते. काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये भारतीय सैन्यबरोबरच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबझार अहमद ठार मारला गेला होता. सबझार अहमद याच्या खात्म्यानंतर आता हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नव्या दमाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. हिजबुल मुजाहिद्दीनच्या या नव्या बॅचचा फोटो बुधवारी इंटरनेटवर व्हायरल झाला होता. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथील तळावर नव्या तुकडीला प्रशिक्षण दिले जात आहे. या तुकडीत २७ दहशतवाद्यांचा समावेश असून त्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.