दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला होता. त्यानंतर सर्व भाविकांना आणि पर्यटकांना जम्मू काश्मीरमधून परतण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर आता किश्तवाड पासून माछिलदरम्यान आयोजित होणारी पारंपारिक माछिल यात्रा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 25 जुलैपासून या यात्रेला सुरूवात झाली होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आता ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

किश्तवाडमध्ये असलेले चंडीमातेचे मंदिर जम्मू काश्मीरमधील एक पारंपारिक देवस्थान मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी पारंपरिक माछिल यात्रेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जम्मू काश्मीर व्यतिरिक्त पंजबा, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून भाविक येत असतात. या यात्रेसाठी प्रशासनाकडून मोठी तयारीही करण्यात येते. किश्तवाड ते माछिल गावापर्यंत 30 किलोमीटरची यात्रा करून भाविक या ठिकाणी दुर्गा मातेच्या मंदिरात पूजा अर्चना करतात.

यावर्षी 25 जुलै रोजी ही यात्रा सुरू करण्यात आली होती. परंतु शनिवारी राज्य सरकारने ही यात्रा नियोजित वेळेपूर्वी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांना परतण्याचे आदेश देण्यात आले आहे. नियोजित वेळेप्रमाणे ही यात्रा 5 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार होती. यापूर्वी जम्मू काश्मीर सरकारकडून अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडण्याची सूचना करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असून जम्मू काश्मीर सरकारने यात्रेकरु आणि पर्यटकांना पुन्हा परतण्यासाठी व्यवस्था करत तात्काळ काश्मीर सोडा अशी सूचना केली होती. गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे ही यात्रा 13 दिवस आधीच रोखण्यात आली. यात्रेच्या मार्गावर पाकिस्तानी भुसुरुंग आणि स्नायपर रायफल सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.