दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील मेजर केतन शर्मा शहीद झाले. मेजर केतन शर्मा यांचं पार्थिव मेरठमधील त्यांच्या घऱी पोहोचलं आहे. मेजर केतन शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी एकीकडे शोक व्यक्त केला जात असून संतापही जाहीर होत आहे. लष्कराचे जवान घरी पोहोचताच केतन शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांच्या गळ्यात पडून रडू लागले. शहीद केतन शर्मा यांच्या आईने तर माझा वाघ मुलगा कुठे आहे, ते सांगा ? म्हणत आक्रोश व्यक्त केला.

शहीद मेजर केतन शर्मा यांचं पार्थिव त्यांच्या मेरठमधील घरी पोहोचले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख बिपीन रावत यावेळी श्रद्धांजली वाहणार आहेत. आपल्या मुलाच्या पार्थिवाची वाट पाहत असताना लष्कराच्या इतर जवानांना पाहून कुटुंबाला भावना आवरणं कठीण झालं. मेजर शर्मा यांच्या आईंच्या डोळ्यातून तर अश्रूंचा पूर वाहत होता. वारंवार त्या माझा मुलगा कुठे गेला मला सांगा ? हा एकच प्रश्न विचारत होत्या.

२०१२ साली लष्करात भरती
मेजर केतन शर्मा २०१२ साली लष्करात भरती झाले होते. मेजर केतन शर्मा यांच्या कुटुंबात चार वर्षांची मुलगी कैरा आणि पत्नी इरा शर्मा आहेत. २७ मे रोजी सुट्टी संपल्यानंतर ते पुन्हा काश्मीरात गेले होते. मेजर केतन शर्मा शहीद झाल्याचं वृत्त कळल्यापासून त्यांचं संपुर्ण कुटुंब शोकावस्थेत आहे. सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी कुटुंबाने केली आहे. मेजर केतन शर्मा यांच्या काकांनी सरकारने एकदाच योग्य उत्तर देत, ही नेहमीची लढाई बंद केली पाहिजे असं म्हटलं आहे.

२५ लाखांची आर्थिक मदत जाहीर
यादरम्यान राज्य सरकारने शहीद मेजर केतन शर्मा यांच्या कुटुंबासाठी २५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. एका रस्त्याचं नामकरण करत त्याला मेजर केतन शर्मा यांचं नाव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.