अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या ७६५ जणांना सुरक्षा दलांनी अटक केल्याची माहिती गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये ५ ऑगस्टनंतर दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. दगडफेक आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित १९० प्रकरणांमध्ये ७६५ जणांना अटक करण्यात आली आहे, दगडफेकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी धोरण आखण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

दहशतवाद्यांचाअड्डा उद्ध्वस्त

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ातील दहशतवाद्यांच्या छुप्या अड्डय़ांमधून सुरक्षा दलांनी एक बिनतारी यंत्र संच आणि स्फोटके हस्तगत केली. सुरनकोटे जवळच्या जंगलात संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती गावकऱ्यांनी सुरक्षा दलांना दिली होती, त्यानुसार तेथे शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.

सुरक्षा दलांनी धैरच्या जंगलातील छुप्या अड्डय़ांमधून सात सुरुंग, एक गॅस सिलेंडर आणि बिनतारी यंत्र संच जप्त केले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पुलवामातील स्फोटप्रकरणी चार दहशतवादी जेरबंद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात स्फोट घडविणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे मंगळवारी पोलिसांनी सांगितले.

पुलवामाच्या अरिहाल परिसरामध्ये जुलै महिन्यात दहशतवादी हल्ला करण्यात आला होता त्याचा तपास सुरू असताना हल्ल्यात शारिक अहमद याचा हात असल्याची माहिती मिळाली. अहमद हा सातत्याने परदेशी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता आणि परिसरामध्ये हल्ले करण्याचा कट रचत होता, असे पोलिसांनी सांगितले. अहमद याने अकिब, आदिल आणि ओवेस या जैश-ए-मोहम्मदच्या अन्य तीन दहशतवाद्यांसह कट रचला आणि अरिहाल परिसरात दहशतवादी हल्ला केला. या चारही आरोपींनी अटक करून ही टोळी उद्ध्वस्त करण्यात आली. हे सर्व जण जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले.