काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यामुळे पाकिस्तानचा प्रचंड जळफळाट सुरु आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केले. पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये मंगळवारी त्यांनी हे विधान केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नव्हता असा दावा सुद्धा इम्रान यांनी यावेळी केला.

मोदी सरकार कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेऊन काश्मीरच्या जनतेचा आवाज दडपू शकत नाही असे इम्रान म्हणाले. यावेळी बोलत असताना इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही टीकेचं लक्ष्य बनवलं. संघाच्या जातीयवादी विचारसरणीतून भारतीय जनता पार्टीनं ३७० कलम हटवण्याचं काम केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीकोनातून मुसलमान हे दुय्यम दर्जाचे आहेत असे इम्रान म्हणाले.

आरएसएसला भारतामध्ये फक्त हिंदूच हवे होते. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुस्लिमांना ते दुय्यम समजून वागणूक द्यायचे. मोहम्मद अली जीना यांना ही गोष्ट आधीच कळली होती असे इम्रान आपल्या भाषणात म्हणाले. हिंदुंना पहिलं प्राधान्य देण्याच्या जातीयवादी विचारातून भारताची निर्मिती झाली आहे तर पाकिस्तानात सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते असा दावा त्यांनी केला.