दहशतवाद्यांनी उरी येथे लष्कराच्या छावणीवर जो हल्ला केला, त्यात तिसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतदानात लोकांमध्ये भीती पसरवणे हाच मुख्य उद्देश होता, असे लष्कराने सांगितले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत असे त्यांनी सांगितले.
पंधराव्या कोअरचे कमांडिंग जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल सुब्रता साहा यांनी सांगितले, की बारामुल्ला व उरी दरम्यान जे रस्ते आहेत, तेथे दाट वस्ती आहे. त्यामुळे नागरिकांना लक्ष्य करून त्यांना निवडणुकीच्या मतदानापासून परावृत्त करणे हा प्रमुख हेतू होता. घुसखोरीविरोधी जाळ्याच्या अपयशामुळे हल्ला झाल्याचा आरोप फेटाळताना त्यांनी सांगितले, तसे असते तर दहशतवादी नागरिकांवर हल्ले करू शकले असते.
दहशतवादी आले व त्यांना प्रथम ६० मीटर अंतरावर लष्करी चौकीचा सामना करावा लागला, त्यात सहाही अतिरेक्यांना ठार करण्यात आले. त्यामुळे मोठी किंमत मोजली असली, तरी आमची सुरक्षा फळी यशस्वी झाली आहे. निरपराध नागरिकांपर्यंत दहशतवादी पोहोचू नयेत, यासाठी जवानांनी प्राणार्पण केले, असे लेफ्टनंट जनरल साहा यांनी सांगितले.
हल्लेखोरांना पाकिस्तानचा सक्रिय पाठिंबा होता, याचे पुरावे मिळालेले आहेत, सीमेवर केलेले हल्ले समन्वयित व सुसंघटित होते. हल्ले करणारे दोन्ही गट लष्कर-ए-तोयबाचे होते व अन्न पाकिटे, शस्त्रे, कपडे यावर पाकिस्तानी उत्पादकांचे शिक्के होते. त्यांच्याकडे काही दिवस पुरेल एवढे अन्न होते. तसेच जीपीएसही सापडले.नौगाम भागात सहा अतिरेकी ठार झाले तर एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी धारातीर्थी पडला, अशी माहितीही साहा यांनी दिली.