News Flash

…तर भारताला सडेतोड उत्तर देऊ; पाकच्या उलट्या बोंबा!

म्हणे, पाक सैनिकांनी हल्ला केलाच नाही

संग्रहित छायाचित्र.

पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या चौक्यांवर हल्ला चढवला. त्यात दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानी सैनिकांनी जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर भारतानेही पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर शस्त्रसंधी धाब्यावर बसवणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांनी कांगावा केला आहे. भारताने दुःसाहस केले तर सडेतोड उत्तर देण्यात येईल, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या चौक्यांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तान आणि भारतात तणाव वाढला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या संचालकांमध्ये हॉटलाइनवरून चर्चा झाली. ही चर्चा दर आठवड्याला होते, असे मोघम उत्तर पाकिस्तानी सैन्याने दिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याचा पाकिस्तानी सैनिकांवर भारताने केलेला आरोप तथ्यहिन असल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानी सैनिकांनी कोणत्याही क्षेत्रात घुसून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले नाही. सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी केली नाही, असे पाकिस्तानी लष्कराच्या संचालकांनी (लष्करी कारवाई विभाग) म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यातील सद्यस्थितीवरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याचा आरोप करण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटल्याचे पाकच्या डीजीएमओंनी सांगितले.

पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केल्याचे पुरावे द्या, अशी मागणीही पाकिस्तानी लष्कराने केली आहे. आम्ही नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यास कटिबद्ध आहोत. मात्र, समोरून कोणत्याही प्रकारचे धाडस केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. जागा आणि वेळ आम्ही निवडू, असा इशाराही पाकिस्तानने दिला आहे. दरम्यान, सोमवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबार आणि रॉकेट हल्ल्यात दोन भारतीय जवान हुतात्मा झाले होते. हुतात्मा झालेल्यांमध्ये परमजीत सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांचा समावेश होता. हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. एक मे २०१७ रोजी कृष्णा सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दोन चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी रॉकेट हल्ला करत गोळीबारदेखील केला. पाकिस्तानी सैनिकांनी भ्याड हल्ला करत आमच्या दोन जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली, असल्याचे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या या नृशंस कृत्याचे चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यानंतर रात्री उशिरा भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या ७ सैनिकांना कंठस्नान घालून त्यांच्या दोन चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 7:58 pm

Web Title: jammu kashmir attack pakistan army dares india reply to any reckless action
Next Stories
1 भाजप देशभक्तांची संघटना: अमित शहा
2 बेहिशेबी संपत्तीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करा; मोदींचे अधिकाऱ्यांना आदेश
3 १३ कोटी आधारकार्डांची सुरक्षा धोक्यात
Just Now!
X