तब्बल पाच महिन्याच्या कालावधीनंतर जम्मू काश्मीरमधील सरकारी रूग्णालयांमध्ये ब्रॉडबँड सेवा तर सर्व मोबाईलवर एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमध्ये एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाइन, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बंदीच्या काही दिवसांनंतर यामध्ये थोडी सवलत देत ही सेवा हळूहळू सुरू करण्यात आली होती. सुरूवातील लँडलाइन आणि त्यानंतर पोस्टपेड मोबाईल सेवेला सुरूवात करण्यात आली होती. सर्व सरकारी रूग्णालयांमध्ये ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाईलवर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी दिली. नववर्षाच्या सुरूवातीसह हे पाऊल उचलण्यात आले आहे. काश्मीरमध्ये अद्यापही इंटरनेट आणि प्रीपेज मोबाईल सेवा सुरू होणं बाकी आहे.

सध्या या सेवा केव्हा सुरू केल्या जातील याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. सरकार सध्या यावर विचार करत आहे. स्थिती सुधारण्यासाठी लवकरच इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. हळूहळू अन्य सरकारी रूग्णालय आणि शाळांमध्येही इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे, असंही कंसल म्हणाले. मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आलेल्या या सेवांमुळे विद्यार्थी, टूर ऑपरेटर्स, व्यापाऱ्यांना फायदा होईल, असंही त्यांनी नमूद केलं.