जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी रविवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कविंदर गुप्ता हे आता उपमुख्यमंत्री असतील. गुप्ता सध्या जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, आज (सोमवार) मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. या फेरबदलात भाजपाकडून काही नवीन चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल एन.एन.व्होरा आज दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा राजभवन ऐवजी कन्वेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. राज्य सरकार वर्षांत दोन वेळा आपले सचिवालय बदलत असते. सहा महिने श्रीनगर येथून तर ६ महिने जम्मू येथून कामकाज चालते. पीडीपीचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपाकडून दोन रिक्त जागा भरण्याशिवाय काही जुन्या मंत्र्यांना हटवून नव्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

मंत्रिमंडळातून किती मंत्र्यांना हटवले जाणार किंवा सामील करून घेतले जाणार याची संख्या स्पष्ट नाही. भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांच्याकडे ही यादी आहे, अशी माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. दरम्यान, दि. १७ एप्रिल रोजी मेहबुबा मुफ्ती सरकारने आपल्या सर्व ९ मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. परंतु, पक्षाने त्यांचे राजीनामे राज्यपालांकडे पाठवले नव्हते. दोन वर्ष जुन्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कठुआ प्रकरणी भाजपाचे मंत्री लाल सिंह आणि चंद्रप्रकाश गंगा यांनी या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनात रॅलीत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. तेव्हापासून भाजपा दबावात असल्याचे सांगण्यात येते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक किंवा दोन राज्यमंत्र्यांना त्यांची चांगली कामगिरी लक्षात घेऊन कॅबिनेटपदी बढती दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या जम्मू-काश्मीर सरकारमध्ये भाजपाचे सहा कॅबिनेट मंत्री यामध्ये सहकारी सदस्य सज्जाद लोन यांचाही समावेश आहे. तसेच ३ राज्यमंत्रीही आहेत. राज्यात मुख्यमंत्री समवेत कमाल २५ मंत्री असू शकतात. सध्या १४ मंत्री पीडीपीचे आहेत आणि उर्वरित भाजपाकडे आहे.