जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्याने राज्य सरकार कोसळलं असून राज्यपाल लागवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल एन एन वोहरा यांनी बुधवारी राज्याची सुत्रं हाती घेतली आहेत. यासोबतच काश्मीरमध्ये प्रशासकीय हालचालीदेखील सुरु झाल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निकटवर्तीय समजले जाणारे छत्तीसगडचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) बीव्हीआर सुब्रमण्यम यांना काश्मीरमध्ये आणण्यात आलं आहे. दुसरीकडे सुरक्षा दलांनी दहशतवादाविरोधातील कारवाईचा वेग वाढवला आहे. बुधवारी डीजीपी एसपी वैद यांनी आता दबावातून मुक्त झाल्याचा संकेत देत आता दहशतवादाविरोधातील कारवाईला वेग आणणार असल्याचं सांगितलं आहे. राज्यपाल लागवटीत काम करणं पोलिसांना सोपं जाईल असं एसपी वैद बोलले आहेत.

एसपी वैद बोलले आहेत की, ‘आमचं ऑपरेशन सुरु राहणार आहेत. रमझानदरम्यान ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. ऑपरेशन याआधीही सुरु होतं, त्यांना आता वेग देण्यात येईल’. यावेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, राज्यपाल लागवट सुरु झाल्याने काही फरक पडेल का तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘मला वाटतं यामुळे काम करणं सोपं जाईल’. रमझानमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आल्याने दहशतवाद्यांना फायदा झाल्याचंही वैद यांनी सांगितलं आहे.

त्यांनी सांगितलं की, ‘रमझान शस्त्रसंधीदरम्यान कॅम्पवर होणाऱ्या हल्ल्यांचं उत्तर देण्याची परवानगी आम्हाला होती. पण आमच्याकडे जरी कोणती माहिती असेल तरी आम्ही ऑपरेशन लॉन्च करु शकत नव्हतो. अशा परिस्थितीत शस्त्रसंधीमुळे दहशतवाद्यांना खूप फायदा झाला’, असं वैद यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान दिल्लीतील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीदेखील लष्कराच्या कारवाईत वेग आणणार असल्याचं म्हटलं आहे. ‘आम्ही फक्त रमझानपुरतं ऑपरेशन स्थगित केलं होतं. पण काय झालं ते आणण सर्वांनीच पाहिलं आहे. राज्यपाल लागवट लागू झाल्याने कोणताही फरत पडणार नाहीये. आमचे सर्व ऑपरेशन पहिल्याप्रमाणे सुरु राहतील. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाहीये’, असं बिपीन रावत बोलले आहेत.