जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला यांची बुधवारी सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

16 जुलै 2018 रोजी सीबीआयने फारूक अब्दुल्ला आणि अन्य तीन जणांविरोधात जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यावेळी क्रिकेट असोसिएशनमध्ये घोटाळा झाला होता, त्यावेळी फारूख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे (जेकेसीए) अध्यक्ष होते. 2001 ते 2011 या कालावधीदरम्यान, जेकेसीएमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आले होते.

जेकेसीएच्या काही अधिकाऱ्यांवर असोसिएशनच्या फंडमधील कोट्यवधी रूपयांच्या चोरीचा आरोप करण्यात आला होता. माजी क्रिकेटपटू अब्दुल माजिद आणि निसार अहमद डार यांनी 2012 मध्ये एक याचिका दाखल करून कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यानंतर सीबीआयकडून एक आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये जम्मू काश्मीरचे तात्कालिन अध्यक्ष फारूख अब्दुल्ला, जनरल सेक्रेटरी सलीम खान, खजिनदार अहसान मिर्झा आणि जम्मू काश्मीर बँकेचे एक्झिक्युटिव्ह अहमद मंसिर यांच्या नावाचा समावेश होता. 2015 मध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणी अधिक तपास करण्याचे आदेश दिले होते.