भाजपाने मंगळवारी जम्मू- काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षासोबत केलेली युती तीन वर्षांनी तोडली. जम्मू- काश्मीरमधील सुरक्षास्थिती सुधारण्यात स्थानिक सत्ताधारी पक्षाला अपयश आल्याने त्यांच्याबरोबर काम करणे अशक्य झाल्याचे कारण भाजपाने दिले. शांतता, विकास या दोन कारणांसाठी आम्ही सत्तेत राहिलो. पण खोऱ्यात दहशतवाद आणि हिंसाचार वाढत असून धर्मांधतेनेही टोक गाठले आहे. यामुळे सत्तेतून बाहेर पडत असल्याचे भाजपा नेते राम माधव यांनी मंगळवारी सांगितले होते. मात्र, पीडीपीची साथ सोडण्याचे खरे कारण वेगळेच असल्याची चर्चा  आता रंगली आहे.  ही कारणे काय आहेत, याचा घेतलेला हा आढावा…

१. पीडीपीच्या एक पाऊल पुढे
जम्मू- काश्मीरच्या राजकीय वर्तुळात पीडीपी आगामी काही महिन्यांमध्ये भाजपाशी काडीमोड करणार, अशी चर्चा सुरु होती. याची कुणकुण भाजपा नेत्यांनाही लागली होती. पीडीपीने आधी काडीमोड केला असता तर भाजपाची नाचक्की झाली असती. त्यामुळे अशा स्थितीत पीडीपीच्या अगोदरच सत्तेतून बाहेर पडणे, सोयीस्कर ठरेल, याची जाणीव पक्ष नेत्यांना झाली होती. सरकारमधून बाहेर पडून जनतेसमोर जाणे सोपे होईल, असे भाजपाला वाटत होते.

२. मुफ्तींचा भाजपाशी असहकार
तीन वर्षांपूर्वी पीडीपी- भाजपाने ऐतिहासिक युती करत सत्ता स्थापन केली.  पण सरकार स्थापनेनंतर पीडीपी आणि भाजपामध्ये खटके उडत होते. भाजपाच्या मागण्यांकडे मेहबूबा मुफ्ती दुर्लक्ष करायच्या, असे सांगितले जाते. उदाहरणार्थ, २००८ मध्ये अमरनाथमध्ये जमिनीच्या वादातून आंदोलन झाले होते. या आंदोलनात तत्कालीन पीडीपी- काँग्रेस सरकारने हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित १५० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे रद्द करण्याची भाजपाची मागणी केली होती. मेहबूबा मुफ्ती यांचे वडील आणि दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. पण त्यांच्या निधनानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी या मुद्दयावरुन यू- टर्न घेतला. तर एका मशिदीला जागा देण्यावरुनही भाजपा- पीडीपीत खटके उडाले होते.

३. जम्मूत भाजपाविरोधी वातावरण
जम्मूमध्ये भाजपाविरोधात असंतोष वाढत असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली. कठुआमधील बलात्कार प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपाविरोधात नाराजी पसरली होती. अशा परिस्थितीत राजीनामा देऊन किमान जम्मूतील व्होट बँक कायम राहिल, अशी भूमिका नेत्यांनी घेतली.