संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूबाबत दिलेला ठराव रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत अपक्ष आमदार इंजिनीअर रशीद अहमद यांनी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे अखेर मार्शलना पाचारण करून त्यांना सभागृहाबाहेर काढावे लागले.
अफझल गुरू याचे अवशेष त्याच्या कुटुंबीयांकडे द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव रशीद अहमद यांनी मांडला होता तो सभागृहाच्या कामकाजातून का रद्द करण्यात आला त्याचे स्पष्टीकरण अध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी रशीद यांनी केली.सभागृहात ज्या ठरावांवर चर्चा घ्यावयाची होती त्याबाबत सोडत काढण्यात आली आणि त्यामध्ये हा ठराव रद्द झाला, असे रशीद यांना सांगण्यात आले. मात्र त्यामुळे रशीद यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत येऊन निदर्शने केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याचे पार्थिव देण्याबाबत भारत सरकार पाकिस्तानशी चर्चा करू शकते तर सरकार गुरूचे अवशेष त्याच्या कुटुंबीयांकडे का सुपूर्द करीत नाहीत, असे रशीद म्हणाले.