जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. भारतीय सुरक्षादलांनी अखनूर सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याचा तळ उद्धवस्त केला आहे. पाकने हा तळ अत्यंत गोपनियरित्या उभारला होता. आज (रविवार) भारतीय लष्कराकडून पुरावा म्हणून याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानचा तळ दिसतोय व त्यावर पाकिस्तानचा झेंडाही दिसून येतो.

दुसरीकडे नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सकाळी ११.५० वाजता पाकने गोळीबार केला.

पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. शनिवारी रात्री मुळचे राजस्थानचे असणारे जवान हरी वाकर हे शस्त्रसंधी उल्लंघनादरम्यान झालेल्या गोळीबारात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बांदिपोरा आणि शोपियन जिल्ह्य़ात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानी अतिरेक्यांसह तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. शुक्रवारी तीन दहशतवादी ठार झाल्याने राज्यात गेल्या २४ तासांत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. बंदिपोरा जिल्ह्य़ातील हाजिन परिसरामध्ये रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षारक्षकांनी शोपियनमधील इमामसाहिब परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. त्या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्याला सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तर दिले.