जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून आता बँकांना लक्ष्य केले जात आहे. कुलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांनी कॅश व्हॅन लुटल्याची घटना ताजी असतानाच आज, मंगळवारीही दहशतवाद्यांनी बँक लुटल्याची घटना घडली आहे. दोन बंदूकधारी दहशतवाद्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना धाक दाखवून तब्बल ६५ हजारांची रोकड लुटून पोबारा केला आहे.
Two terrorists barged into Ellaquai Dehati Bank in Kader Yaripora area of Kulgam district and looted Rs 65,000 from the bank.
— ANI (@ANI_news) May 2, 2017
गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी येथील बँकांना लक्ष्य केले आहे. बँक लुटीच्या घटना वारंवार घडत असताना आज बंदूकधारी दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील कादर गावातील इलाकी देहाती बँकेत दरोडा टाकला. बँकेच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखली. बँकेतील ६५ हजारांची रोकड घेऊन पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, दहशतवाद्यांनी सोमवारीही कुलगाम परिसरात पैसे घेऊन जात असलेल्या व्हॅनवर हल्ला चढवला होता. कुलगाममधील जम्मू आणि काश्मीर बँकेची ही व्हॅन होती. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच पोलीस कर्मचारी आणि दोन बँक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांना व्हॅनमधून बाहेर खेचून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर या दहशतवाद्यांनी तब्बल ५० लाख रुपये आणि पाच रायफल्स घेऊन पळ काढला होता.
गेल्या काही महिन्यांमध्ये दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये बँक लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काश्मीरमध्ये आधीच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून बँका लुटल्या जात असाव्यात, असा गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांचा कयास आहे. याशिवाय पुढील काळात दहशतवाद्यांकडून बँक लुटल्या जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे. दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनी येथील दहशतवाद्यांना तसे आदेशच दिले आहेत, असे समजते. त्यामुळे भविष्यात दहशतवादी हल्ले परतवून लावणे आणि बँक लुटीच्या घटना रोखणे असे दुहेरी आव्हान सुरक्षा दलाच्या जवानांसमोर असणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2017 6:04 pm