गेल्या वर्षी जम्मू- काश्मीरमध्ये एका तरुणाला जीपला बांधून त्याचा मानवी ढाल म्हणून वापर करणारे मेजर लितुल गोगोई पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गोगोईंसोबत आलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने गोगोई यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आणि हे प्रकरण शेवटी पोलिसांकडे पोहोचले. या प्रकरणी जम्मू- काश्मीर पोलीस आणि सैन्याने स्वतंत्र चौकशी सुरु केली आहे.

मेजर लितुल गोगोई यांनी श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममतामध्ये एक रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. ओळखपत्र तपासले असता ती बडगामची रहिवासी असल्याचे समोर आले. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितले. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. शेवटी हा वाद चिघळला आणि प्रकरण पोलिसांकडे गेले.

पोलिसांनी गोगोई, ती तरुणी आणि एका तरुणाला पोलीस ठाण्यात नेले. चौकशीनंतर त्या तिघांचीही सुटका करण्यात आली. ती तरुणी सज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांच्या मार्फत चौकशी सुरु आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले तर सैन्यानेही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

हॉटेल व्यवस्थापनाचा आक्षेप काय होता?
गोगोई यांनी श्रीनगरच्या हॉटेल ग्रँड ममतामध्ये एका रात्रीसाठी खोली बुक केली होती. एका वेबसाईटवरुन ही खोली बुक करण्यात आली. मी व्यवसायानिमित्त आलो असून मी बिझनेस क्रेडिट कार्डचा वापर करेन, असे त्यांनी वेबसाईटवर बुकिंगदरम्यान म्हटले होते. हॉटेलमधील कर्मचारी एजाझ अहमद चाशू यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, गोगोई हॉटेलमध्ये चेक इन करत असताना त्यांच्यासोबत एक तरुणी होती. रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांना त्या तरुणीच्या वयावर संशय आला. त्यांनी तरुणीकडे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र मागताच ती घाबरली. पण शेवटी तिने आधार कार्ड दाखवले. आधार कार्डवरुन ती बडगामची असल्याचे स्पष्ट झाले. आम्ही स्थानिक तरुण आणि तरुणींना रुम देत नाही. त्यामुळे आम्ही तरुणीला नकार दिला आणि यावरुन गोगोई यांनी आमच्याशी वाद घातला, असे ते म्हणाले. हॉटेलमधील कर्मचारी गोगोईंचे सामान घेऊन त्यांच्या कारजवळ गेला असता चालक समीर अहमदला हा प्रकार समजला. यानंतर तो देखील गोगोईंच्या बाजूने भांडण्यासाठी आत आला. गोगोई आणि समीर या दोघांनीही आम्हाला शिवीगाळ केली तसेच मारहाण केली, असा आरोप हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.