जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्याने सध्या तेथील परिस्थिती सामान्य करण्याबद्दल सगळीकडे चर्चा सुरु आहे. यादरम्यान एक दिलासा देणारी बातमी समोर आली असून लष्कर भरतीत तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. लष्करात भरती होऊन देशसेवा करण्यासाठी राज्यातील मुस्लिम बहुल चिनाब खोर आणि पीर पंजाल भागातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारपासून सुरु झालेली लष्कर भरती एक आठवडा सुरु राहणार असून आतापर्यंत सहा हजार तरुणांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये रामबन आणि किश्तवाड जिल्ह्यातील २५०० तरुण सहभागी आहेत. तर डोडा येथील ३६०० तरुणांनी आपलं नशीब आजमवलं आहे.

दुसरीकडे राजौरी जिल्ह्यातील ८००० तरुणांनी लष्कर भरतीत सहभागी होण्यासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंछ आणि रियासी जिल्ह्यातूनही ४००० हून अधिक नावं समोर आली आहेत. याशिवाय उधमपूर जिल्ह्यातील ८००० हून अधिक तरुणांनी लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर पहिल्यांदात लष्कर भरती मोहीम सुरु करण्यात आली आहे. सहभागी होणाऱ्यांपैकी ४० टक्के तरुण मुस्लिम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना आधी शारीरिक चाचणी यशस्वीपणे पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर ज्यांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल त्यांना लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीत सहभागी करुन घेतलं जाणार आहे. भरतीची सर्व प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आली असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.