सोमवारी (७ जून २०२१) जम्म-काश्मीरमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून मागील २२ वर्षांपासून पोलीस या व्यक्तीचा शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीरमधील रायसी जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणं आणि त्यांना मदत केल्याप्रकरणी पोलीस मागील २२ वर्षांपासून या व्यक्तीचा शोध घेत होते, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मोही-उद्-दिन असं या व्यक्तीचं नाव असून तो १९९९ पासून बेपत्ता होता. दहशतवाद्यांना मदत करण्याच्या प्रकरणामध्ये त्याचं नाव समोर आल्यानंतर तो पोलिसांपासून पळ काढत लपून बसला होता. मात्र सोमवारी तब्बल २२ वर्षानंतर मोही-उद्-दिनला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस खात्याच्या प्रवक्त्यांनी दिलीय.

१९ वर्षांपूर्वी स्थानिक न्यायालयासमोर मोही-उद्-दिनविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने १८ फेब्रुवारी २००२ रोजी मोही-उद्-दिनच्या अटकेचं वॉरंट जारी केलं होतं. सीआरपीसी कलम ५१२ अंतर्गत हे वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मोही-उद्-दिनने पोलिसांना तपासामध्ये सहकार्य न केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आलाय. “आरोपीने तपासामध्ये कधीच यंत्रणांना सहकार्य केलं नाही. किंवा गुन्हा दाखल झाल्यापासून त्याने पोलिसांसमोर समोर आत्मसमर्पण केलं नाही,” असं पोलिसांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांना मोही-उद्-दिन हा रायसीमध्ये असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली होती. याच माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी योग्य नियोजन करुन मोही-उद्-दिनला अटक केली.  मागील सहा आठवड्यांमध्ये रायसी पोलिसांनी केलेली ही १४ वी अटक आहे. रायसी पोलीस मागील सहा आठवड्यांपासून अशा फरार असणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवत असून त्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळत असल्याची माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिलीय.