जम्मू – काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी शनिवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. जवानांनी गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा केला. घटनास्थळावरून दहशतवाद्यांकडील शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, लष्कराच्या जवानांनी काल, शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. तसेच पाच घुसखोरांना कंठस्नान घातले होते. गेल्या तीन दिवसांत नियंत्रण रेषेजवळ चार वेळा घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. ते प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडले होते. यात सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते, अशी माहिती लष्कराने दिली होती. नियंत्रण रेषेजवळ जानेवारीपासून आतापर्यंत २२ वेळा घुसखोरीचे प्रयत्न झाले आहेत. ते लष्कराच्या जवानांनी उधळून लावले असून यात ३४ घुसखोरांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात काही दहशतवादी संघटना घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. २५ ते ३० दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्यात यशस्वी झाल्याचीही माहिती आहे. काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास पाकिस्तानकडून मदत केली जात आहे, असे बोलले जात आहे.