जम्मू-काश्मीरमधील बुडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. ही चकमक शनिवारी रात्री उशिरा बुडगाममधील अरिझल गावात झाली. दहशतवादी गावात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला.

दरम्यान, अनंतनाग येथील डोरू परिसरात शुक्रवारी रात्री उशिराने सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा ताब्यात घेण्यात आली. मंगळवारीही कुपवाडा येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यादिवशी चकमकीनंतरही सुमारे २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याचे सांगण्यात आले होते. तत्पूर्वी, दि. १२ मार्चला अनंतनाग जिल्ह्यात हकुरा परिसरात दहशतवादविरोधात अभियान सुरू करण्यात आले होते. यामध्येही तीन दहशतवादी मारले गेले होते.