जम्मू-काश्मीरमधील पंचायत सदस्य आणि सरपंचांना पोलीस संरक्षण तसेच प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी काश्मीरमधील संरपच आणि पंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले. या शिष्टमंडळाने मंगळवारी अमित शाह यांची भेट घेतली.

आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सुरक्षा मागितल्यानंतर त्यांनी प्रशासनामार्फत सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती कुपवाडाचे सरपंच मीर जुनैद यांनी दिली. सरपंच आणि पंचायत सदस्याला प्रत्येकी दोन लाख रुपयाचे विमा सुरक्षा कवच देण्याचाही त्यांनी शब्द दिला आहे असे हरवानचे सरपंच झुबेर निशाद भट यांनी सांगितले. हरवान गाव श्रीनगर जिल्ह्यात आहे.

पुढच्या १५ ते २० दिवसात जम्मू-काश्मीरमध्ये मोबाइल सेवा पूर्ववत होईल असे शाह यांनी शिष्टमंडळाला सांगितले. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. संसदेतही अमित शाह यांनी हे आश्वासन दिले होते. मागच्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये पंचायच निवडणुका झाल्या.