जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याप्रकरणी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. “लोकांचा आवाज दाबून जम्मू काश्मीरमध्ये प्रेशर कुकरसारखी परिस्थिती निर्माण केली होती. एक वेळ अशी येईल जेव्हा सरकार हात जोडून विचारेल की राज्याला विशेष दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखी काय हवं,” असं मुफ्ती म्हणाल्या.

“केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत आहे आणि त्यांना बोलण्याची परवानगी दिली जात नाही. हे एका प्रेशर कुकरप्रमाणे आहे. त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली आहे. परंतु प्रेशर कुकरचा जेव्हा स्फोट होतो तेव्हा तो पूर्ण घराला जाळून टाकतो,” असं म्हणत मुफ्ती यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

आणखी वाचा- पाकिस्तानात जायचं असतं तर…कलम ३७० पुन्हा लागू होईपर्यंत मरणार नाही : फारूख अब्दुल्ला

एक वेळ येईल जेव्हा…

मेहबुबा मुफ्ती या पीसीजीडीच्या होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पोहोचल्या होत्या. “पीडीपी ही सद्यस्थितीत काहीही न बोलण्याची भूमिका घेणार नाही. तसंच जोपर्यंत राज्यात कलम ३७० पुन्हा लागू केलं जात नाही तोवर शांतही बसणार नाही. एक वेळ अशी असेल जेव्हा दिल्लीतील सरकार हात जोडून (काश्मीरच्या लोकांना) विचारेल की त्यांना राज्याला विषेश दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखी काय हवं आहे,” असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा- हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं : संजय राऊत

भाजपा कायम सत्तेत राहणार नाही

“भाजपा कायम सत्तेत राहणार नाही. केंद्र सरकारनं कलम ३७० रद्द करून संविधानाचा गैरवापर केला आहे. भाजपाच्या अजेंड्यानुसार सध्या देश चालवला जात आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदोलकांना तुरुंगात बंद करण्यात येत आणि त्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे. हेच रामराज्य आहे का? तुम्ही पीडीपीला का घाबरता?,” असे सवालही मुफ्ती यांनी केले.