जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत अटक झालेले जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधिक्षक देवेंद्र सिंह यांच्या चौकशीत काही नवीन गोष्टींचा खुलासा झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधिक्षक देवेंद्र सिंह यांनी दहशतवाद्यांना आधी चंदिगड आणि नंतर दिल्लीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी लाखो रुपये घेतले होते. दरम्यान संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अफजल गुरुसोबतही देवेंद्र सिंह यांचे संबंध होते अशी माहिती समोर आली आहे.

दहशतवादी अफजल गुरुने कथितपणे देवेंद्र सिंह यांचं नाव घेतलं होतं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, देवेंद्र सिंह आणि अफजल गुरु यांच्यात नेमके काय संबंध होते याचा तपास सध्या सुरु आहे. भारतीय संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकूण १४ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये सहभाग असणाऱ्या अफजल गुरुला दोषी ठरवण्यात आलं आणि ९ फेब्रुवारी २०१३ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली.

हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत अटक झालेले जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधिक्षक देवेंद्र सिंह श्रीनगर विमानतळावर तैनात होते. महत्त्वाचं म्हणजे दहशतवादाविरोधातील मोहिमेत निभावलेल्या भुमिकेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देत गौरव करण्यात आला आहे. देवेंद्र सिंह दहशतवादी विरोधी टीमचाही भाग होते.

जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी डीएसपी देवेंद्र सिंह यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांप्रमाणेच त्यांचीही चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. देवेंद्र सिंह यांची सर्व सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी केली जाणार आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जात असल्याचं विजय कुमार यांनी सांगितलं आहे.

विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र सिंह यांच्या निवासस्थानी पोलिसांनी तीन एके-४७ रायफल आणि पाच हॅण्ड ग्रेनेड जप्त केले आहेत. देवेंद्र सिंह काही दहशतवाद्यांना घेऊन कारने जात असताना अटकेची कारवाई करण्यात आली. त्याच्यासोबत दहशतवादी नवीद अहमद शाह उर्फ नवीद बाबू आणि रफी अहमद यांनाही अटक करण्यात आली आहे.