पाकिस्तानातून मिळणाऱ्या आर्थिक रसद प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. दुसरीकडे फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानीच्या दोन्ही मुलांची बुधवारी यंत्रणेकडून चौकशी सुरू असताना काश्मीर खोऱ्यात अशांतता आणि दगडफेक करण्यासाठी फुटीरतावादी नेते पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्रालयानं राज्यसभेत दिली. फुटीरतावादी नेते दहशतवाद्यांच्याच नव्हे तर दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांच्या संपर्कातही आहेत, अशी माहितीही मंत्रालयाकडून देण्यात आली.

गेल्या वर्षभरापासून काश्मीरमध्ये अशांतता आहे. दगडफेकीच्या घटना घडत आहेत. पाकिस्तानमधून मिळालेल्या आदेशांनुसार फुटीरतावादी नेते काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करत आहेत, असं गृहमंत्रालयानं राज्यसभेत सांगितलं. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून फुटीरतावाद्यांना आर्थिक रसदही पुरवली जाते, अशी माहितीही मंत्रालयानं दिली. गृहमंत्रालयानं ही खळबळजनक माहिती दिल्यानं आता आगामी काळात अनेक फुटीरतावादी नेते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर येणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून फुटीरतावादी नेत्यांची चौकशी करण्यात येत असून आणखी महत्त्वाची माहिती समोर येईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

दरम्यान, फुटीरतावादी नेता झाकीर मूसा या प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती अलिकडेच उघड झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलेल्या चौकशीत नईम खान, शाहीद उल इस्लाम हा लष्कर – ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.