जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी आज झाली. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. बर्फवृष्टीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह असून बर्फात खेळण्याचा ते आनंद ते लूटत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्गही काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, खराब हवामानामुळे येथील त्रिकुला टेकड्या, तसेच वैष्णोदेवी गुंफा येथे भाविकांसाठी पुरवण्यात येणारी हेलिकॉप्टर सेवा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजौरी येथील पीर पंजल भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने मुघल रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. थंडीपासून संरक्षणासाठी लोक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवताना दिसत आहेत.

त्याचबरोबर हिमाचल प्रदेशातील सोलांग व्हॅलीतही यंदाच्या मोसमातील ताज्या बर्फवृष्टीला आज सुरुवात झाली आहे. यामुळे पर्वत रागांमधील या परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातही ताज्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे.

भारताच्या उत्तरेकडील भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने राजधानी दिल्लीतही त्याचा परिणाम जाणवत असून शहरातील अनेक भाग धुक्यात हरवून गेले आहेत. त्यामुळे विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तसेच रेल्वे गाड्याही उशीराने धावत आहेत. येथील शीत लहरींमुळे उर्वरित भारतात येत्या दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

शिमला येथे देखील बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून येथील खारापठार भाग मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे निसर्गसौंदर्याने नटला आहे.