जम्मू काश्मीरमधील सोपोरे जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी एक जवान शहीद झाला असून एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान एक फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे. हा फोटो सगळ्यांचं मन जिंकत आहे. या फोटोत एक जवान लहान मुलाला दहशतवादी हल्ल्यापासून वाचवत सुरक्षित ठिकाणी नेत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनाही दहशतवादी टार्गेट करत असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी सकाळीदेखील दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. हा चिमुरडा हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या मृत नातेवाईकाच्या शेजारी बसला होता. जवानाने या मुलाची सुटका करत त्याला सुरक्षितस्थळी नेलं. फोटोमध्ये जवान मुलाला भीती वाटू नये यासाठी त्याच्याशी गप्पा मारत गुंतवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे.

चिमुरड्याची सुटका केल्यानंतर त्याला त्याच्या आईकडे नेण्यात आलं. एएनआयने जवान मुलाला गाडीतून नेत असतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

सुरक्षा जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करत अनेकांना ठार केलं आहे. यामुळे दहशतवादी वारंवार जवनांवर हल्ला करत असून यावेळी स्थानिक नागरिक तसंच लहान मुलांनाही टार्गेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी दहशतवद्यांनी अनंतपोरा येथे केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.