दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनवर रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संबंधीत पोलीस स्टेशनच्या संपूर्ण परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. दहशतवादी याच भागात लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा रक्षक घरोघरी शोध घेत आहेत. दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनवर चारही बाजूंनी हल्ला केला होता. शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची रायफल घेऊन ते फरारही झाले. त्यामुळे ते याच परिसरात लपून बसले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याच्या बहाण्याने आले होते. शोपिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी सक्रिय आहेत. येथे नेहमीच दहशतवाद्यांचे हल्ले झाले आहेत.

यापूर्वी गुरुवारी दहशतवाद्यांविरोधातील चार विविध मोहिमांमध्ये एक जवान शहीद झाला होता. तर हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते. या मोहिमेत एकूण सहा लोक मारले गेले होते. अनंतनाग जिल्ह्यातील काजीगुंड येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे सुरक्षा रक्षकांनी कारवाई केली होती.