जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. अनंतनाग येथील बिजबेहारा येथे राष्ट्रीय रायफल्सचा हा तळ आहे. अधिक माहिती समजू शकलेली नाही. या हल्ल्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.

दरम्यान, अनंतनाग येथे पोलिसांच्या पथकावर शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षकासह सहा जवान शहीद झाले. या हल्ल्यात आणखी जवान जखमी झाले असून यातील काही जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. शहीद झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव फिरोझ असून ते पुलवामा येथील रहिवासी आहेत.

जम्मू- काश्मीरमध्ये पोलिसांवरील दहशतवादी हल्ल्याची ही गेल्या २४ तासांमधील तिसरी घटना आहे.  दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री श्रीनगरमधील हैदरपोरा येथे पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेले कॉन्स्टेबल शहजाद यांचा मृत्यू झाला. तर दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात घराबाहेरच पोलीस दलातील शबीर अहमद यांना गोळ्या घातल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे प्राण वाचू शकले नव्हते.